मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

+भाषा म्हणून श्रेष्ठ असूनही मराठी ची प्रगती का होत नाही?

प्रेमापोटी भाषा टिकत नाही. जी भाषा त्यातून वावरणार्‍या व्यक्तिला 'शिक्षण, नोकरी, कामधंदा, पैसा, मानसन्मान' मिळवून देईल तीच भाषा आधुनिक युगात टिकणार आहे. आधुनिक युगात ज्या भाषेला 'ध्वनी (बोलणे-ऐकणे), कागद (लिहीणे-वाचणे), टाईप करणे (संगणकाचा मूक्तपणे वापर व संगणकातून वावर) प्रत्येक भाषीकापर्यंत पोचवता येईल त्याच भाषेला हे सारे जमणार आहे.

आता महाराष्ट्रात मराठी आणि इंग्रजी भाषा समांतर पद्धतीने वावरत आहेत. कोणत्याही वर्तमानकाळात तीन पिढ्या असतात, 'आजी-आजोबा, आई-बाबा आणि मुले'. यातील 'आजी-आजोबा' यांनी समजा 100 टक्के मराठी भाषा आयुष्यात वापरली असेल तर 'आई-बाबां'नी 80 टक्के मराठी आणि 20 टक्के इंग्रजी भाषा वापरल असे कदाचीत म्हणता येईल. यातील आकडेवारी मूळीच अचूक नाही, केवळ मराठीच्या प्रगतीचा वा अधोगतीचा अंदाज यातून कळु लागेल. आता मुलांच्या बाबतीत 'मराठी भाषा 50 टक्के व इंग्रजी 50 टक्के' असे अंदाजे घडत आहे. खेड्यांपेक्षा शहरातून मुलांबाबतचे इंग्रजीकडे झुकणारे प्रमाण जास्त आहे. मोलकरणीपासून मालकापर्यंत, मजूरापासून कारखानदारांपर्यंत, मतदारापासून मंत्र्यापर्यंत सर्वांनाच आपापल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकावे असे वाटते. त्यामुळे 'भाषेचे शिक्षण' आणि 'शिक्षणाची भाषा' या दोन्ही पातळींवर मराठी भाषेची अधोगती प्रचंड वेगाने होत आहे.

भाषा म्हणून इंग्रजीपेक्षा मराठी क्षेष्ठ असूनही हे सारे घडत आहे. याला आळा घालण्यासाठीचे दोन स्थर आम्ही निवडले आहेत. 'अधोगतीचा वेग कमी करणे' हा पहीला टप्पा. याला मराठी भाषेचे शिक्षण आधुनिक युगातील तिन्ही माध्यमांतून देता येणे, असे नाव देता येते.

हा टप्पा जर जमला तरच मग इंग्रजी बरोबर मराठीची वर्णी 'शिक्षणाची भाषा' या क्षेत्रात आणणे शक्य होणार आहे. कारण आज प्रगत, सक्षम व उच्च शिक्षणाची सोय केवळ इंग्रजीतूनच महाराष्ट्रात उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीची सुत्रे याच व्यक्तिंवर निर्भर राहणार आहेत.

आजमितीस या तरूण पिढीची मानसिकता व जडणघडण आपण समजावून घेउ. यातील सांख्यीक आकडेवारी कमीजास्त असेल. पण साधारण गाभा लक्षात येईल.

ध्वनी (बोलणे-ऐकणे) - घरी आजी-आजोबा यांच्या समवेत केवळ मराठी बोलले जाते. आई-बाबा यांच्यासमवेत खेड्यातील वातावरणात 90 टक्के तर शहरी वातावरणात 50-60 टक्केच मराठी बोलले जाते. मित्र-मैत्रिणींशी खेडयातून मराठी 50 टक्के व हिन्दी 50 टक्के बोलले जाते तर शहरात घरात मराठी पण बाहेर रस्त्यावर हिन्दी बोलले जाते.

कागद (लिहीणे-वाचणे) - शिक्षणच इंग्रजीतून होत असल्याने 'वाचणे' हे केवळ इंग्रजी पुरतेच मर्यादीत राहण्याचे दिवस आता मराठीला लाभणार आहेत. दुकानाच्या पाट्या, वर्तमानपत्रे, पोस्टर्स, असा लिहीलेला कोणताही मजकूर मराठीत लिहीला नाही तरी चालतो हे महाराष्ट्रात गेली 20 वर्षे घडत आहे. त्यामुळे पाट्यातरी मराठीत लावा असा नियम करावा लागतो ! अजूनही बर्‍याच प्रमाणात तरूणांना मराठी वाचणे जमते. पण हे जमणे म्हणजे नवशिक्या लहान मुलाने वर्तमानपत्रातील संपादकीय वाचण्यासारखे ठरते !

टाईप करणे (संगणकाचा मूक्तपणे वापर व संगणकातून वावर) - याबाबत मराठी व इंग्रजी भाषेबाबतची तुलनाही होऊ शकत नाही ही परीस्थीती आहे. याबाबत थोडक्यात सारांश मांडत आहे. लेखन ही गोष्ट 'साहित्य' याच्याशी निगडीत जास्त असते. आज 'मराठी साहित्य' याच्याशी संबंधीत असलेल्या एक टक्का व्यक्तिंना संगणकातून मराठी टाईप करता येत नाही. 'साहित्य सम्मेलना'च्या किती अध्यक्षांना संगणकातून मुक्तपणे मराठी वापरता येत आहे व होते? महाराष्ट्रातील किती मंत्री, अधिकारी, साहित्य सम्मेलने वा नाट्य सम्मेलने यांच्या अध्यक्ष व सभासद यांना संगणकातून मराठी येते? बीएड् डीएड् च्या कॉलेजातून 'मराठीचा संगणकीय वापर' असा विषयही नाही. मग त्यांनी शिक्षक बनल्यावर आधुनिक पद्धतींचा वापर शिक्षण क्षेत्रात कसा आणावा?

भाषेची प्रगती होते ती याच तीन पिढ्यांच्या प्रयत्नातून होय. आपण या तिन्ही पिढ्यांच्या आजच्या सर्वसामान्य मनोगताची चर्चा करू.

आजी-आजोबा आणि संगणक -

आमचे आयुष्य आता किती राहीले? आता या वयात का आम्ही हे नवे तंत्रज्ञान शिकायचे? त्याचा फायदा काय? असे प्रश्न वयस्कर विचारतात. याचे महत्त्वाचे कारण नवे शिकायचे वय निघून गेलेले असते. त्यात आधी संगणक आणि तेही मराठीतून (!) शिकायचे म्हणजे अंगावर काटा येतो !

समजा आजी-आजोबांना संगणकातून मराठी टाईप करता येऊ लागले तर काय घडेल? त्यांनी आजवरच्या आयुष्यात कमावलेल्या अनुभवांचे डिजीटालायझेशन पूर्ण होईल. आजवर त्यांनी ऐकणे-बोलणे आणि लिहीणे-वाचणे यातून आयुष्यभर मराठी वापरले. म्हणजेच मराठीचा पिढ्यान् पिढ्यांचा वारसा आज जर कोणाच्या सर्वात जास्त संग्रही असेल तर तो 'आजी-आजोबा' यांच्याकडे, असे नक्की म्हणता येते.

भाषा समृद्ध होते ते भाषेतून दिले-घेतले जाणारे ज्ञान, यामुळेच होय. जर पुढील पिढ्यांच्या लहान मुलांना आजी-आजोबांनी 'संगणकीय मराठी' शिकवले असे घडले तर? इंग्रजीसारखेच मराठीचा वापर संगणकातून 'फेसबुक, आर्कुट, वेब-डिझायन, ईमेल, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, पेन्ट, कोरल, पेजमेकर, फोटोशॉप, . . ' अशा सर्व ठिकाणी जर सर्वांना परीपूर्णतेने मनसोक्त मोफतपणे करता आला तर?

होय, हेच आम्ही घडवले आहे. आजवर अनेक कंपन्या, सरकार व गुगुलसारख्या संस्थांनी संगणकातून मराठी' येण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. मराठी यांची नेहमीच ऋणी राहील. आता आम्ही मराठीच्या मानसिकतेतून, शंभर टक्के मराठी, कोणत्याही कॉम्प्युटर वा लॅपटॉप मध्ये, सहजसुलभपणे समाजातील सर्व पिढ्यांना, सर्व बोलींना, अगदी आंधळे-मुले-बहीरे यांना सुद्धा टाईप करता येणारे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत उपलब्ध केले आहे.

संशोधक म्हणून आमचे काम झाले आता हवे आहे तुमचे सहकार्य, या 'जलद सोप्पी मराठी' सॉफ्टवेअरचा प्रसार-प्रचार करायला. आपण सर्वांनी मिळून ज्ञानेश्वरांच्या मायमराठीला आधुनिक युगात उच्च दर्जा मिळवून देऊ शकतो. भाषा म्हणून मराठी श्रेष्ठ आहेच आता तिला संगणकातून योग्यता मिळवून देऊ. आपल्या पिढीने पुढच्या पिढीला 'संगणकीय साक्षरता' दिली याची नोंद इतिहासालाघ्यावीच लागेल असे कार्य एकत्रीतपणे करू.

आपला, शुभानन गांगल
मोबाईल 9833102727, ईमेल jalad.soppi.marathi@gmail.com




डाऊनलोड कसे करावे?